हिंमत असेल तर बांग्लादेशातील हिंदूंवरील हल्ले रोखा; ठाकरेंचं मोदी-शहांना ओपन चॅलेंज
- MahaLive News
- Aug 7, 2024
- 2 min read
उद्धव ठाकरे आज दिल्लीत आहेत. येथे इंडिया आघाडीतील नेत्यांची ते भेट घेणार आहेत. याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बांग्लादेशातील हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. ठाकरे म्हणाले, बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. आता या हिंदू लोकांच्या रक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मणिपुरला तर गेला नाहीत निदान आता नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी बांग्लादेशात तरी जावं. तेथे हिंदूंवर होत असलेले हल्ले रोखावेत. नरेंद्र मोदींनी एवढं तरी काम करावं. जे मला औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख म्हणतात त्यांनी आता हिंदूंवरील हल्ले रोखावेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. सध्या बांग्लादेशात ज्या काही घटना घडत आहेत. त्यातून जगात एक मेसेज गेला आहे. फक्त बांग्लादेशच नाही तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि जगातील अन्य काही देशांत अशा घटना घडत आहेत. देशात सर्वसामान्य नागरिक सर्वात श्रेष्ठ आहे. त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जाऊ नये. आता जनतेच्या याच न्यायालयाचा फैसला बांग्लादेशात झालेला दिसतोय. सत्तेत असणाऱ्या लोकांनी या गोष्टींचा विचार करायला हवा, असा इशारा ठाकरेंनी एनडीए सरकारला दिला.
दिल्ली दौऱ्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता ठाकरे म्हणाले, मी दिल्लीत काही राजकीय कामानिमित्त आलेलो नाही. सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे. सगळे नेते येथे आहेत. त्यामुळे सर्वांची भेट घेण्याच्या उद्देशाने येथे आलोय. तसेही इंडिया आघाडीतील नेत्यांशी आम्ही संपर्कात असतोच. पण फोनवर बोलणं आणि प्रत्यक्ष भेट घेणं यात फरक आहे. आता दिल्लीत आलोय तेव्हा इंडिया आघाडीतील नेत्यांची भेट घेणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीचं सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी चांगलं काम केलं असे तुमचे मित्र पक्ष म्हणतात तेव्हा आता राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास पुन्हा मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या कुणी मी मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं असं म्हटलं असेल त्यांनाच तुम्ही प्रश्न विचारा की मी मुख्यमंत्री म्हणून त्यांना चालेल का असा गुगली सवाल उद्धव ठाकरेंनी टाकला.
Comentarios