निवडणूक आयोगाविरोधात उद्धव ठाकरेंची दिल्ली उच्च न्यायालयात धाव...
- MahaLive News
- Oct 10, 2022
- 1 min read

मुंबई- केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने दंड थोपटत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत शिवसेनेने निवडणूक आयोगाने बाजू मांडण्याची संधीच दिली नसल्याचा उल्लेख केला आहे. प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. या याचिकेची आजच तातडीने सुनावणीसाठी घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर दिल्ली उच्च न्यायालय काय निकाल देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता उच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेनेच्या याचिकेवर आज सोमवारी किंवा उद्या मंगळवारी सुनावणी होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घाईघाईत सगळे निर्णय घेतले. या सगळ्या गोष्टी आम्ही याचिकेत मांडल्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालय यामध्ये काहीतरी हस्तक्षेप करेल, अशी आशा शिवसेना नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केली. एकीकडे शिवसेनेकडून दिल्ली उच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाद मागितली जात आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाकडे पक्षचिन्हांचे तीन पर्याय सादर करण्यात आले आहेत.
Comments