top of page

कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेऊन पुणे शहरातील निर्बंध शिथिल; उपमुख्यमंत्री अजित पवार


पुणे- राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पाच स्तर निश्चित केले आहेत. या पाचही स्तरांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत, त्यानुसार पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेता पुणे शहरातील निर्बध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून सोमवारपासून हे निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले. मात्र, कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच हा निर्णय लागू होईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण क्षेत्रात मात्र यापूर्वीचेच निर्बंध कायम राहतील, असेही त्यांनी सांगितले.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, खासदार गिरीष बापट, डॉ. अमोल कोल्हे, श्रीमती वंदना चव्हाण यांच्यासह आमदार दिलीप मोहीते, ॲड अशोक पवार, सुनील टिंगरे, चेतन तुपे, राहुल कुल, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, टास्क फोर्सचे डॉ. डी. बी. कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सीजन उपलब्धता, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली असून ही समाधानाची बाब असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सोमवारपासून हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. मात्र, सोमवारपासून ही परवानगी देण्याआधी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निकषाचाही विचार केला जाणार आहे. पॉझिटिव्हीटी रेट विचारात घेऊनच हा निर्णय घेतला जाणार आहे. पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत असेल, तर याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे कोरोना दक्षता नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. लसीकरणाचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. लस उपलब्धतेबाबत सातत्याने आपला पाठपुरावा सुरू असून दिव्यांग बांधवाना लसीकरण सुरू करण्यात आले आहे तसेच परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही लसीकरणाबाबत आदेश देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात दररोज एक लाखापर्यंत लसीकरण होईल, एवढी क्षमता निर्माण करण्यात आली आहे, लस उपलब्धतेप्रमाणे यामध्ये गती घेता येईल. ३१ ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात लसीकरणाचे काम होईल, असे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, म्युकरमायकोसिसचे निदान लवकर होणे आवश्यक असते. त्यानुसार म्युकरमायकोसिसची लक्षणे, काळजी, उपचार यांची माहिती ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचवावी, तसेच म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा तसेच उपलब्धतेबाबतचाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेत कोणत्याही परिस्थितीत कान, नाक, घसा तसेच इतर लक्षणे जाणवताच तातडीने रुग्णालयात जावून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तसेच शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांनी व नागरिकांच्या सहकार्याने बाधितांची संख्या घटली असली तरीही संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोना रोखण्यासाठी विविध स्तरावर उपचार यंत्रणा निर्माण करण्यात आली. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढली. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता ग्रामीण यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारणीवर भर देण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. यावेळी जि.प. अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, खासदार गिरीश बापट, खासदार डॉ.अमोल कोल्हे, खासदार श्रीमती वंदना चव्हाण यांच्यासह आमदार दिलीप मोहिते, आमदार ॲड अशोक पवार, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, आमदार राहुल कुल, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही महत्वाचे विषय मांडले. डॉ.सुभाष साळुंके म्हणाले, लसीकरण वाढविले तर कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्‍या लाटेचा धोका रोखता येईल, असे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर, प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिककेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

@महालाईव्ह न्यूज पुणे

#Mahalive Mahalive News

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page