top of page

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी; पालकमंत्री सुभाष देसाई...


औरंगाबाद- जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने टीम वर्कच्या सहाय्याने नियंत्रण मिळवून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. याच कौतुक तर आहेच पण येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी सर्व यंत्रणा यामध्ये लसीकरण, उपलब्ध खाटा, ऑक्सिजनचा पुरवठा, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्यासह आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी असे ‍निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी लोकप्रतिनिधींच्या कोरोना संबधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत दिले.

या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, खासदार इम्तियाज जलील, खासदार डॉ.भागतव कराड, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, अंबादास दानवे, रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाने, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.बी.नेमाने, आदींची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री श्री.देसाई यांनी लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेत लोकांची गर्दी होईल अशा ठिकाणी प्रतिबंध आणि काही बंधने त्याचप्रमाणे मास्क वापरण्याबाबत सूचनांसह ‘ब्रेक द चेनचे’ पालन करुन रुग्णसंख्या वाढणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर त्याचप्रमाणे प्रशिक्षित आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना लसीकरण करुन घेतलेले प्रमाणपत्राची मागणी केली असता लसीकरणा करण्यामध्ये वाढ होईल. आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांचा लसीकरणामध्ये आतापर्यंत महत्वपूर्ण योगदान राहिले असून यापुढेही त्यांच्या सहकार्याने लसीकरण पूर्ण करण्याबाबत आरोग्य यंत्रणेने नियोजन करावे. खासदार इम्तियाज जलील यांनी म्युकरमायकोसिस या आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यातील दंतरोग चिकित्सक यांची रिक्त पदे भरावीत जेणे करुन या आजारावरील उपचार वेळेत उपलब्ध होऊन रुग्णांमध्ये घट होईल असे मत मांडले. बालकांच्या कोरोना प्रतिबंधासाठी उपाय योजना म्हणून व्हेंटिलेटर वापराचे प्रशिक्षण असलेले डॉक्टर यांचे पथक सज्ज ठेवावे. त्याचप्रमाणे मास्क वापराबाबत अंमलबजावणी होते की नाही याबाबत प्रशासनाने चोख जबाबदारी पार पाडावी. कोरोना कालावधीमध्ये ओराग्य यंत्रणेने तात्पुरत्या स्वरुपात डॉक्टर व परिचारिकांच्या सेवा उपलब्ध करुन घेतल्या होत्या या सेवा पूर्ववत सूरु ठेवण्याबाबतची मागणी खासदार डॉ.भागवत कराड यांनी यावेळी केली. आमदार हरिभाऊ बागडे यावेळी म्हणाले की, मास्क जर वापरले नाही तर आजची गर्दीची परिस्थिती लक्षात घेता कोरोनाची तिसरी लाट अधिक प्रभावी ठरू शकते यामुळे पोलीस प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण आणण्याबरोबरच विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना केली. प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी केलेले काम कौतुकास पात्र असून यापुढेही लग्न समारंभ, अंत्यविधी, बाजारपेठा येथील गर्दी नियंत्रणात ठेवून सभांना मर्यादित लोकसंख्येच्या उपस्थितीची परवानगी द्यावी अशी सूचना आमदार अंबादास दानवे यांनी केली. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी गंगापूर व वैजापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयास एम.डी.मेडिसिन डॉक्टरांची उपलब्धता व लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभारण्याबाबतची मागणी केली. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. यामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा, उपलब्ध खाटांची संख्या, ऑक्सिजनचा पुरवठा आणि साठा, जिल्ह्यात झालेले लसीकरण, म्युकरमायकोसिसबाबतची सद्यपरिस्थिती, तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने केलेले नियोजन याची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाली असला तरी कोरोना नाहीसा झालेला नाही. ‘ब्रेक दी चेन’ मोहीमे अंतर्गत नियमात शिथिलता आलेली असल्याने जनतेने अधिक सावधानता बाळगणे आवश्यक असून शासकीय यंत्रणांनी अधिक सज्ज राहून कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अधिक सजगतेने काम करावे अशा सूचना उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांना आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री श्री.देसाई यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.बी.नेमाने, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. लॉकडाऊनच्या संदर्भात निर्बंध शिथील झाले असले तरी नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे असून गर्दी होणार नाही याची काळजी घेत नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन करत श्री.देसाई म्हणाले की, लहान मुलांसाठी व्हेंटिलेटरची स्वतंत्र व्यवस्था करावी, तसेच लसीकरण मोहीम अधिक सक्रीय करत दररोज किमान 50 हजार ते 1 लाख लसीकरण झाले पाहिजे, असे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठरवून त्या दिशेने नियोजन केल्यास भविष्यातील आरोग्य विभागावरचा ताण नक्कीच कमी होण्यास मदत होईल आणि म्हणूनच सर्व शासकीय यंत्रणांनी पूर्वी केल्याप्रमाणे आताही समन्वयाने काम करण्याच्या सूचना श्री.देसाई यांनी दिल्या. प्रारंभी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या लशींच्या प्रमाणात 92% लसीकरण करण्यात आले असून 138 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. 96% पेक्षा जास्त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण असून आतापर्यंत 12 लाख 6 हजार 495 जणांचे आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असल्याचे सांगून श्री.चव्हाण यांनी जिल्ह्यात सात हजार खाटा उपलब्ध असून त्यात ऑक्सिजनच्या 3 हजार 230 खाटा, व्हेंटिलेटरच्या 552 खाटा उपलब्ध आहेत. 360 ॲम्ब्युलन्स कार्यान्वित असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असून ऑक्सिजन निर्मिती देखील करण्यात येत आहे. 11 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार करण्याकरिता आठ ऑक्सिजन प्लान्ट पैकी काही ऑक्सिजन प्लान्ट कार्यन्वित करण्यात आले असून काही प्लान्ट येत्या काही दिवसात सुरू करण्यात येतील अशी माहिती देत श्री.चव्हाण यांनी लसीकरण व्यवस्थापन, ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धता, शहरात टाळेबंदीदरम्यान हॉटेल्स आणि मद्यविक्रीची दुकानांवर करण्यात आलेल्या कारवाईची सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली.


जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

@महालाईव्ह न्यूज औरंगाबाद


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page