जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बियाणे व खतांचा योग्य प्रमाणात व दरात पुरवठा, कृषी सचिव...
लातूर- जिल्ह्यातील खरिपाचे प्रत्यक्ष क्षेत्र सुमारे सहा लाख हेक्टर इतके दिसून येत आहे तर त्यातील सोयाबीन पिकाचे साडेचार लाख हेक्टर व तूर पिकाचे 90 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन व तूर या प्रमुख पिकांच्या बियाना सह इतर सर्व आवश्यक बियाणे तसेच खतांचा योग्य प्रमाणात व दरात पुरवठा झाला पाहिजे यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित लातूर जिल्हा खरीप हंगाम तयारी आढावा बैठक 2021 च्या अनुषंगाने कृषी सचिव एकनाथ डवले मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., कृषी विभागाचे सहसंचालक तुकाराम जगताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस. आर. चोले, उपजिल्हाधिकारी(रोहयो) शोभा जाधव यांच्यासह कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक महाबिजचे अधिकारी उपस्थित होते.
कृषी सचिव डवले पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्याची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच कृषी केंद्रावर बियाणे व खते चढ्या दराने विकली जात आहेत का याबाबत खात्री करावी. तसेच अधिकाऱ्यांनी बियाणे व खत याबाबत शेतकऱ्यांची संवाद साधावा व त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील किमान 100-200 शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला पाहिजे. या सर्व शेतकऱ्यांची त्यांनी नियमित संपर्क ठेवला पाहिजे. त्यामुळे शेतकरी स्वतःहून जे नाविन्यपूर्ण प्रयोग करत आहेत व मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत आहेत त्याची माहिती आपल्या तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. तसेच कृषी विभागाचे नवीन तंत्रज्ञान व योजना याचीही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचली पोहचावी यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क व समन्वय वाढवावा, असे निर्देश श्री. डवले यांनी दिले.
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comentarios