जिल्ह्यात पाणंद रस्त्याची प्रशासनाकडे आलेल्या मागणीनुसार सर्व कामे तात्काळ सुरू करावीत; पालकमंत्री..
- MahaLive News
- Jun 16, 2021
- 2 min read

लातूर- जिल्हा प्रशासनाकडे पालकमंत्री पानंद रस्त्याची आलेली कामे तात्काळ सुरू करावीत. या रस्त्याच्या कामासाठी राज्यस्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. प्रशासनाकडे पानंद रस्ते मोकळे करण्याबाबत जेवढी मागणी अर्ज येतील त्यावर तात्काळ कार्यवाही करून कामे सुरु झाली पाहिजे याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले. शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित पालकमंत्री पानंद रस्ते काम आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हाधिकारी रोहयो शोभा जाधव, उपविभागीय अधिकारी सुनील यादव व तहसीलदार स्वप्निल पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री पानंद रस्ते अंतर्गत प्रत्येक तालुक्याला जेवढी मागणी अर्ज आले आहेत त्यातील प्राधान्यक्रम ठरवून प्रशासनाने निधीच्या उपलब्धतेनुसार तात्काळ कामे सुरू करावी उर्वरित कामासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. तसेच जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला जन सुविधा योजना अंतर्गत ग्रामीण रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी दहा कोटीचा निधी दिलेला आहे त्या अंतर्गत चे कामे ही सुरू करून ती वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी दिल्या. पालकमंत्री पाणंद रस्ते अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना रस्ते हवे आहेत त्यांनी संबंधित तहसील कार्यालयात रस्ते मागणीचे अर्ज करावेत त्या अर्जाची तपासणी करून त्यानुसार संबंधित यंत्रणेने कामे सुरू करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिल्या. प्रारंभी उपजिल्हाधिकारी श्रीमती जाधव यांनी पालकमंत्री पाणंद रस्त्याचे तीन भाग असून या अंतर्गत भाग 'अ' मध्ये रस्ता मजबुतीकरण केले जाते. भाग ब मध्ये कच्चा रस्ता केला जातो तर भाग 'क' मध्ये कच्चा रस्ता व मजबुतीकरण हे दोन्ही कामे केली जातात अशी माहिती दिली. तसेच या अंतर्गत सन 2019-20 मध्ये 80 रस्त्यांना मान्यता मिळाली होती व त्याकरिता आठ कोटी साठ लाखाचा निधी खर्च झाल्याची माहिती त्यांनी दिली. यातून 130 किलोमीटरचे रस्ते कामे झाल्याचे श्रीमती जाधव यांनी सांगून सन 2020-21 साठी रस्ते कामासाठी 10 कोटीचा निधी प्राप्त असल्याची माहिती त्यांनी दिली.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Comments