संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे दुसरे रिंगण सोहळा आज पार पडणार...
- MahaLive News
- Jun 17, 2023
- 2 min read

पारगाव घुमरे येथे 17 जूनला दुसरे 'रिंगण सोहळा' पार पडणार आहे. तर 20 जून रोजी नांगरडोह गावात तिसरे रिंगण होईल. तर चौथे रिंगण 23 जूनला कव्हेदंड व पाचवे रिंगण 28 रोजी पंढरपूर येथे होणार आहे. 27 जून रोजी होळे येथील भीमा नदी पात्रात नाथांच्या पादुकांचा स्नान सोहळा होणार आहे. तसेच 29 जून रोजी पंढरपूर शहरात नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येणार आहे. संत एकनाथ महाराजांची पालखी मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. दरम्यान एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे हाटकरवाडी येथील परंपरा कायम ठेवत शुक्रवारी 16 जून रोजी परिसरातील नाथभक्ताने जोरदार स्वागत केले. सोबतच विना बैलाच्या बैलगाडीतून सोहळ्याचे मानकरी नाथवंशज यांना बसून अवघड गारमाथा घाट हजारो वारकरी भाविक भक्ताच्या उपस्थितीत पार करण्यात आला. हा आनंदाचा सोहळा आपल्या डोळ्यात सामावून घेण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती दिसून आली. तर संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे दुसरे रिंगण सोहळा आज घुमरे पारगाव या ठिकाणी पार पडणार आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारी सोहळ्यात सहभाग होण्यासाठी निघालेल्या श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचा सहावा मुक्काम रायमोह येथे झाला. दरम्यान हा मुक्काम संपवून शुक्रवारी पालखी सातव्या मुक्कामासाठी सकाळी प्रस्थान झाली. तर 425 वर्षाची परंपरा असलेल्या हाटकरवाडी या पंचक्रोशीत सकाळी दहा वाजता पालखी दाखल झाली. यावेळी ग्रामस्थाने नाथांच्या पवित्र पादुकांचे पूजन केले. सोहळ्यातील मानकरी यासह वारकऱ्यांचे भव्य स्वागत देखील करण्यात आले. तर पुढील प्रस्थानसाठी बीड जिल्ह्यातील निसर्गरम्य परिसरातील गारमाथा डोंगरघाटाचा टप्पा हाटकरवाडी येथील नागरिकांच्या उपस्थितीत पार करण्यात आला. यावेळी नाथभक्ताने प्रथेनुसार एक दिवस उपास ठेवला. तसेच या पंचक्रोशीतील तरुणांनी पालखी प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांना विना बैलाच्या बैलगाडीत बसून काही वेळातच गारमाथा डोंगर पार करुन दिला. या डोंगराच्या चौकामध्ये भाविकाच्या दर्शनासाठी पालखी सोहळ्याचा विसावा घेऊन सोहळ्यातील सहभाग वारकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला. त्यानंतर सातव्या मुक्कामासाठी तांबा राजुरी मार्ग पाटोदा येथे सोहळा वाजत गाजत मार्गस्थ झाला आहे. दरम्यान संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे दुसरे रिंगण घुमरे पारगाव या ठिकाणी आज शनिवारी (17 जून) दुपारी संपन्न होणार आहे.
Comments