लातूरच्या सिटीबसमध्ये महिलांना मोफत प्रवास या उपक्रमाला वर्षपूर्ती; वर्षभरात २५ लाख महिलांना लाभ...
- MahaLive News
- Mar 19, 2023
- 2 min read

लातूर- शिक्षण क्षेत्रात लातूरचा दबदबा निर्माण झाल्याने आज हजारो विद्यार्थी लातूरला प्राधान्य देत आहेत. शिक्षणासाठी मुलींची संख्या लक्षणीय आहे. शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी यासाठी या विद्यार्थिनींना बराच प्रवास करावा लागतो, त्यासाठी मोठा खर्च व्हायचा, पण आता गत वर्षभरापासून त्यांना मनपाने मोठा आधार दिलाय. १८ मार्च २०२२ रोजी लातूरचे तत्कालीन पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते या मोफत बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता.
या उपक्रमाला झालेल्या वर्षपूर्ती निमित्ताने आज सिटी बसने मोफत प्रवास करणाऱ्या महिलांचा लातूर महिला काँग्रेसच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला आहे. आता या विद्यार्थिनी सिटी बसने मोफत प्रवास करत आहेत. महाराष्ट्र सरकारनं एसटीनं प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिलेली आहे. ती सवलत १७ मार्चपासून लागू झाली आहे. दुसरीकडे लातूर महापालिका क्षेत्रातील महिला प्रवाशांसाठी गेल्या एक वर्षापासून मोफत प्रवास सुरु आहे त्याची आज वर्षपूर्ती झाली आहे. लातूर शहर महापालिकेने वर्षभरापूर्वी महिलांसाठी मोफत सिटी बस सेवा सुरू केली होती.
मनपाच्या या उपक्रमाला आज वर्ष झालं आहे. महिलांना मोफत सेवा देणारी लातूर महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. वाढत्या महागाईत महिलांना घराच बजेट सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. अगदी पाच दहा रुपयांपासून महिलांना विचार करावा लागतो. त्यामुळे महानगर पालिकेचा हा उपक्रम मोठा आधार देत असल्याचं सांगतात. महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे त्यांची महिन्याला १२०० रुपयांची बचत होते. या बचतीचा उपयोग त्यांना महाग झालेलं सिलेंडर खरेदी करण्यासाठी होतो असही आवर्जून सांगतात. आमदार धीरज देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून या उपक्रमाबद्दल माहिती दिली आहे.
जवळपास 25 लाखांपेक्षा अधिक सर्व सामान्य महिलांनी मोफत सिटी बसचा प्रवास केल्याची माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. "18 मार्च लातूर मधील महिलांसाठी एक अविस्मरणीय दिवस आहे. 'जे जे नवे, ते ते लातूरला हवे', हा विचार समोर ठेवून तत्कालीन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख साहेब यांनी केलेल्या सूचनेवरून याच दिवशी महिलांसाठी लातूरमध्ये मोफत सिटी बस सेवेची सुरुवात झाली," असं त्यांनी म्हटलं आहे.
Comments