लातूर जिल्ह्यात आता पुन्हा ५० लोकांच्या उपस्थितीतच विवाह; तर २५ लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार...
लातूर- जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी असली तरी नागरिकांकडून सुरक्षा उपाययोजनांबाबत काहीच दक्षता घेतली जात नसल्याची चित्र आहे. मास्क विरहित लोकांचा वावर वाढला असून, मोजक्या व्यक्तींकडून होणारा मास्कचा वापरही नावालाच दिसत आहे. सुरक्षित अंतरांचा फज्जा उडाल्याचे चित्र असून, अनेकांनी मास्क नाकावरून काढून दाढीसारखा हनुवटीवर आणून ठेवला आहे. यात लग्न सोहळा व अंत्यसंस्काराला असलेली लोकांची गर्दी तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे. यामुळेच जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी शुक्रवारी (ता. १८) अकरा दिवसांतच गर्दीवर मर्यादा आणत विवाह व अंत्यसंस्काराच्या उपस्थितीवर बंधने आणली आहेत. यामुळे आता पन्नास लोकांच्या उपस्थितीत विवाह तर पंचवीस लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
संख्येची मर्यादा ओलांडल्यास संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या बंधनाची सर्व सरकारी यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्थांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिले आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झालेल्या जिल्ह्यात राज्य सरकारने सात जूनपासून अनलॉक करून सर्व व्यवहार सुरू करण्याची मुभा दिली. या स्थितीत गर्दीच्या कार्यक्रमांवर बंधने कायम ठेवण्यात आली होती. विवाहाला शंभर तर अंत्यसंस्काराला पन्नास लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. अकरा दिवसाच्या काळात ही बंधने संपुष्टात आली. विवाह व अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने गर्दी होऊ लागली. उपस्थितीतीवर मर्यादा असल्याचे लोक विसरून गेले. यासोबत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व निर्जंतुकीकरण आदी उपाययोजनांकडे दुर्लक्ष होऊ लागले. मास्कचा वापर कमी होत गेला. गर्दीत बोटावर मोजण्याएवढ्या लोकांकडून मास्कचा वापर होत आहे.काहीजण मास्कचा वापर शो म्हणून करत आहेत. ही परिस्थिती कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच देण्याचाच प्रकार आहे. यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी आतापासूनच गर्दीला आवर घालण्यास सुरवात केली आहे. पहिले पाऊल म्हणून त्यांनी विवाह व अंत्यसंस्काराच्या उपस्थितींवर मर्यादा आणल्या असून अकरा दिवसापूर्वीची संख्येची मर्यादा निम्म्याने कमी केली आहे. यामुळे आता विवाह सोहळ्याला पन्नास तर अंत्यसंस्काराला पंचवीस लोकांची उपस्थिती बंधनकारक राहणार आहे. परिस्थितीत बदल न झाल्यास ही संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Comments