नॅशनल हायस्पीड रेल्वेचा डेपो औरंगाबादेत शक्य; मराठवाडा रेल्वे कृती समिती अध्यक्ष अनंत बोरकर...
- MahaLive News
- Aug 19, 2021
- 1 min read

औरंगाबाद- हायस्पीड ट्रेनचे स्टेशन हे शहराबाहेर नसून सध्याच्या रेल्वेस्टेशन जवळच राहील असा प्रयत्न आहे. याशिवाय याचा डेपोही औरंगाबादला करण्याचा विचार करण्याचे आश्वासन मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे (एमएनएचएसआर) प्रकल्पाचे सहसरव्यवस्थापक अनिल शर्मा यांनी दिल्याची माहिती मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी दिली. पर्यावरण संवर्धन, सामाजिक परिणाम, भूसंपादन प्रक्रिया, रेल्वेचा थांबा, मिळणारा मावेजा आदी विषयांवर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे (एमएनएचएसआर) प्रकल्पाच्या पर्यावरण आणि सामाजिक परिणामाच्या मूल्यांकनासाठी रेल्वे अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि नागरिकांमध्ये बुधवारी (ता. १८) एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात चर्चा झाली. यावेळी रेल्वेचे सहसरव्यवस्थापक अनिल शर्मा, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी मोरे, प्राजक्ता कुलकर्णी, प्रदीप बर्गे, विशाल श्रीवास्तव, राहुल रंजन आदींची उपस्थिती होती. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित आहे. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत पर्यावरण, सामाजिक परिणामासह नागरिक, शेतकऱ्यांचे विचार श्री. शर्मा आणि अपर जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनी समजून घेत त्यांच्याशी चर्चा केली. मराठवाडा रेल्वे कृती समितीतर्फे अनंत बोरकर, प्रल्हाद पारटकर त्याचप्रमाणे विश्वनाथ कदम, करमाडचे सरपंच कैलास उकर्डे, टाकळीचे शिवाजी चंदेल आदींनी विविध उपाय सांगत सूचना केल्या.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज औरंगाबाद
Mahalive News
Comments