कोल्हापूर-पुणे पॅसेंजरला मालवाहू डबे जोडा; सुप्रिया सुळेंची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव कडे मागणी...
- MahaLive News
- Nov 22, 2022
- 2 min read

कोल्हापूर-पुणे पॅसेंजरला मालवाहू डबे जोडावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर जेजुरीस भेट देणारे भाविक तसेच औद्योगिक वसाहतीचा विचार करता पुणे ते लोणंद लोकलला एमआयडीसीमध्ये एक स्टेशन द्यावे, अशीही मागणी केली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पुरंदर विभागातील ताजी फळे आणि भाजीपाला दररोज पुणे आणि कोल्हापूरच्या बाजारपेठेत नेला जातो आणि या बाजारपेठेत आपला शेतीमाल पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना खाजगी वाहतूक वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागतो. पुरंदर भागातील स्थानिक शेतकऱ्यांनी या मागणीचे कौतुक केले आहे.
सुळे पुढे म्हणतात, “बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर तालुका हा भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. तेथून उत्तम दर्जाच्या ताज्या भाज्या, फळे आणि फुले पुणे आणि कोल्हापूरच्या बाजारपेठेत पाठवली जातात, पण कोल्हापूर-पुणे दरम्यानच्या पॅसेंजर ट्रेनला मालवाहू डबे जोडलेले नाहीत. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची वाहतूक खासगी वाहनांतून करावी लागते, जी खूप महाग असते. जर या पॅसेंजर ट्रेनला मालवाहू डबे जोडले गेले तर येथील शेतकरी आपला माल या बाजारपेठेत सहज आणि परवडणाऱ्या किमतीत पाठवू शकतील, असेही पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
जेजुरी हे तीर्थक्षेत्र म्हणून देशभर विख्यात आहे. याशिवाय येथे मोठी औद्योगिक वसाहतही आहे. हजारो कामगार या वसाहतीत काम करतात. या कामगारांच्या सोयीसाठी पुणे ते लोणंद दरम्यान लोकल सेवा मंजूर आहे. येथील कामगारांना एमआयडीसी परिसरातच उतरण्याची सोय झाली तर अधिक सोयीचे होईल. ही गरज लक्षात घेऊन पुणे ते लोणंद या मार्गावर जेजुरी एमआयडीसी परिसरात एक स्टेशन व्हावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, कोल्हापूर-वैभववाडी या कोकण रेल्वेस जोडणाऱ्या मार्गाचे काम तत्काळ सुरू करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिले आहे. कोल्हापूर-वैभववाडी या कोकण रेल्वेस जोडणाऱ्या मार्गाचे काम तात्काळ सुरू करणे, नाशिक-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करणे, कोरोनानंतर सेवा बंद केलेल्या सर्व गाड्या पुर्ववत करणे, कोरोना काळानंतर विविध एक्सप्रेसचे बंद केलेले सर्व थांबे पूर्ववत सुरू करणे या मागण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळ येथे पार्सल सेवा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
Comments