प्राथमिक शिक्षकांना दिवाळी उसनवारीवरच सण; लातूर जिल्हापरिषदेच्या शिक्षकांचे वेतन अद्याप नाही
लातूर- राज्य सरकारने दिवाळी सणासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत सर्वच शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन शनिवार सायंकाळपर्यंत खात्यावर जमा झालेले नाही. दिवाळीचा सण सुरू झाला असून, वेतन न झाल्याने प्राथमिक शिक्षकांना उसनवारीवरच सण साजरा करावा लागत आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबरपर्यंत सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याचा आदेश राज्य शासनाने काढला होता. त्यानुसार तातडीने बिलेही जमा करण्यात आली. जि. प. माध्यमिक, खाजगी शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन शुक्रवारीच खात्यावर जमा करण्यात आले. मात्र, जिल्हा परिषद शिक्षकांना शनिवार सायंकाळपर्यंत वेतन मिळालेले नाही.
विशेष म्हणजे, रविवार, सोमवार असे दोन दिवस शासकीय सुटी आहे. त्यामुळे मंगळवारीच वेतन होईल, अशी अपेक्षा शिक्षकांना आहे. दरम्यान, सर्वच जि. प.च्या मुख्याध्यापकांना वेळेत बिले तालुकास्तरावर जमा केली. त्यानुसार जिल्हास्तरावरही पोहोच करण्यात आलेली आहेत. मात्र, शासनाकडून १२ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी कमी आलेला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे वेतन करता येत नसल्याचे समोर येत आहे. शुक्रवारपासून दिवाळीचा उत्सव सुरू झाला आहे.
या सणानिमित्त वेतन लवकर हाती पडेल व दिवाळीचा सण धूमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन शिक्षकांनी केले होते. मात्र, वेतनच न झाल्याने उसनवारीच सण करण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. वर्षातील सर्वांत मोठा सण दिवाळी आहे. मात्र, या महत्त्वाच्या सणालाच शाासनाचे आदेश असतानाही वेळेत वेतन झालेले नाही. त्यामुळे उसनवारी करून दिवाळीची खरेदी करावी लागत आहे. पुढील दोन दिवस शासकीय सुटी असल्याने वेतन मंगळवारपर्यंत तरी मिळण्याची शक्यता नसल्याचे शिक्षकांनी सांगितले.
Comentários