पुण्यात व आसपासच्या परिसरात अखेर पावसाला सुरुवात; पहा कुठे-कुठे पाऊस...
पुणे- हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून हा येत्या दोन दिवसात राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तो आज खरा ठरला असून अखेर आज सकाळी पुण्यात पावसाच्या सरी बसरल्या आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून मध्यम पावसाच्या सरी पुणे शहरात बरसत आहेत. राज्यात शुक्रवारी अनेक जिल्ह्यात मॉन्सूनने हजेरी लावली होती. पुणे आणि आसपासच्या परिसरात मात्र, पावसाने हुलकावणी दिली होती. यामुळे पाऊस कधी सुरू होणार या प्रतिक्षेत पुणेकर होते. शनिवारी सकाळी अनेक भागात जोरदार पाऊस बरसला तर काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. शनिवारी सकाळ पासून पुण्यात ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळाला. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी ऊन होते. सकाळी सात नंतर पुण्यातील कात्रज, कोंढवा, मुंढवा, बिबवेवाडी, धायरी फाटा, वारजे, शिवणे, हिंगणे, सिंहगड रोड, नांदेड सिटी येथे मुसळधार पावसाळा सुरूवात झाली. तर कोथरूड, डेक्कन, हडपसर, येरवडा, विश्रांतवाडी येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पुणे सातारा मार्गावर खेड - शिवापूर परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
पुणे शहरातल्या उपनगर भागात तसेच शहरातल्या कात्रज, सिंहगड रोड, बाळजीनागर, सहकारनगर, सदाशिव पेठ आणि अन्य शरतल्या ठिकाणी पाऊस पडला आहे. पुण्यात मान्सून सुरू होण्याची तारीख १० जून होती, तर मुंबईसाठी ११ जून होती. पण बिपरजॉय या वादळामुले मान्सून येण्यास विलंब झाला. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्यात लांबणीवर पडलेल्या मॉन्सूनचे अखेर बहू प्रतिक्षेनंतर आगमन झाले आहे. राज्यातील विदर्भात काल मॉन्सूनने हजेरी लावली. लवकरच मॉन्सून पूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या तीन दिवसांत मॉन्सून राज्य व्यापणार आहे. २९ तारखे पर्यंत मुंबई आणि पुण्यासह राज्यात मॉन्सून बरसण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. शुक्रवारी अनेक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्यापही पावसाने म्हणावा तसा जोर पकडलेला नसल्याने राज्यातील काही भागांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
Comments