विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये "मिशन थायरॉईड" जनजागृती व उपचार अभियानाचे उदघाटन
- MahaLive News
- Mar 30, 2023
- 2 min read

लातूर- महाराष्ट्र शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाअंतर्गत रुग्णसेवेसाठी व विविध रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विविध अभियान सुरु केले आहेत. त्यामध्ये दि.30 मार्च 2023 पासून "मिशन थायरॉईड" हे राज्यस्तरीय अभियान हाती घेण्यात आलेले आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये आज थायरॉईड क्लिनीक चे उदघाटन अधिष्ठाता डॉ. समिर जोशी यांच्या हस्ते झाले.
थायरॉईडच्या रोगांनी ग्रस्त स्त्री व पुरुषांना आळस, सुस्तपणा, शरीरावर सूज येणे, भूक न लागतादेखील वजन वाढणे, आवाजात एकप्रकारचा जाडपणा अथवा घोगरेपणा येणे ही लक्षणे थायरॉईड ग्रंथींचे काम मंदावल्याचे दर्शवितात. अनेकदा अशा स्त्रियांना वारंवार गर्भपाताला सामोरे जावे लागते. नवजात बालकांमध्ये थायरॉईड ग्रंथींच्या स्त्रावाअभावी मानसिक दुर्बल्य येऊन अशी बालके लहान खुरी व मंदबुध्दी होऊ शकतात. थायरॉईड ग्रंथींच्या अतिस्त्रावामुळे अतिजास्त रोडपणा, छाती धडधड करणे व क्वचितप्रसंगी डोळे बाहेर येणे अशी लक्षणे आढळतात. अशा रुग्णांसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतील औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत विशेष थायरॉईड ओ. पी. डी. क्र. 110 (क) मध्ये दर गुरुवारी दुपारी 12.00 ते 2.00 या वेळेत चालविली जाणार आहे.
त्यामध्ये PHYSICIAN, SURGEON, E. N. T. SURGEON, PATHOLOGIST, RADIOLOGIST व BIOCHEMIST अशा विविध तज्ञांचा एकत्र समावेश राहणार आहे. थायरॉईडच्या विविध आजारांच्या औषधोपचारांची व ब-याच दृश्य स्वरुपातील थायरॉईडचे विविध परिणाम जसे अन्न घेताना त्रास होणे, श्वास गुदमरणे तसेच थायरॉईडचे विविध कॅन्सर यांसंबधी शस्त्रक्रियाची सोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तरी वरील लक्षणे असलेल्या नागरिकांनी या संस्थेतील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडुन तपासणी करुन घ्यावी व वेळीच उपचार घ्यावे असे आवाहन उदघाटनप्रसंगी संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. समीर जोशी यांनी केले.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन जाधव, प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. निलिमा देशपांडे, प्राध्यापक व विभागप्रमुख शल्यचिकित्साशास्त्र विभाग डॉ. गंगाधर अनमोड, प्राध्यापक व विभागप्रमुख क्षयरोग व उररोग विभाग डॉ. रमेश भराटे, सहयोगी प्राध्यापक डॉ. भाऊराव यादव, डॉ. चंद्रकांत रायभोगे, डॉ. मेघराज चावडा, डॉ. मारुती कराळे, सहाय्यक प्राध्यापक, डॉ. ज्ञानेश्वर पांचाळ, डॉ. ऋषिकेश हरिदास, डॉ. रुद्रमणी स्वामी, डॉ. माधुरी मोरे, अधिसेविका व संस्थेतील इतर अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
#Latur #Mahalive #विलासरावदेशमुखशासकीयवैद्यकीयमहाविद्यालय #BreakingNews #LaturNews #मिशनथायरॉईड
Comments