मराठा समाजाच्या सर्व मागण्या पुर्ण; प्रलंबित विषयांना गती देण्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे निर्देश...
- MahaLive News
- Aug 3, 2021
- 2 min read

मुंबई- मराठा समाजाने मराठा समाजाच्या जवळपास सर्व मागण्यांची पूर्तता होत आली असून मराठा उमेदवारांच्या शासन सेवेतील नियुक्त्यांबाबत शासन निर्णय काढण्यात आले आहेत. तसेच उर्वरित प्रलंबित विषयांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतिगृहे तयार असून स्थानिक पालकमंत्र्यांच्या हस्ते लवकरच त्यांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी उपसमितीचे सदस्य आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे प्रत्यक्ष तर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात २३ ठिकाणी वसतीगृहे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी १४ ठिकाणी वसतीगृहासाठी इमारती तयार असून त्याचे लवकरच उद्घाटन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई व मुंबई उपनगर, पुणे, सातारा, मिरज, कोल्हापूर, बीड, लातूर, अमरावती, नागपूर येथे प्रत्येकी एक आणि नाशिक व औरंगाबाद येथे प्रत्येकी दोन वसतीगृहांचा समावेश आहे. उर्वरित ठिकाणी वसतीगृह सुरू करण्यासंदर्भात जागा उपलब्धतेसाठी महसूल मंत्री हे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेणार आहेत असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलन कर्त्यांवर दाखल ३२५ खटल्यांपैकी ३२४ खटले मागे घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यापैकी १९९ खटले मागे घेण्यात आले असून १०९ खटले मागे घेण्यासंदर्भात न्यायालयात विनंती करण्यात आली आहे. या आंदोलनात मृत झालेल्या ४३ जणांच्या वारसांपैकी ८ वारसांना एसटी महामंडळात रुजू करून घेण्यात असून ६ जण हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रुजू होणार आहेत. उर्वरित वारसांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. तसेच आतापर्यंत १७ मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्यात आली आहे. इतर ३४ जणांची माहिती प्राप्त झाली असून त्यांना लवकरच मदत देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज मुंबई
Mahalive News
Comments