ऑक्टोबरमधील अतिवृष्टीच्या नुकसानीची मिळणार मदत; पंचनामे तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश...
- MahaLive News
- Nov 4, 2022
- 1 min read

ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. काढणीस तयार झालेल्या सोयाबीन कापूस पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांमधून याच्या नुकसान भरपाईची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. आता अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील २५ लाख हेक्टरवर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या बाबत मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे लवकरच या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आतापर्यंत चार हजार सातशे कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिली आहे. आता ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २५ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार मदत करण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान या बाबतीत महसूल आणि कृषी विभागाला पंचनाम्यांचे आदेश दिले असून हे पंचनामे तातडीने पूर्ण करून तसा अहवाल सादर करावा, असे आदेश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मदत व पुनर्वसन विभागाने माहिती दिल्याप्रमाणे जून-जुलै पासून सुरू असलेल्या पावसामुळे ४० लाख,१५ हजार ८४७ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून त्यापोटी चार हजार सातशे कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.
Comments