भिजलेले काडतूस महाराष्ट्राने खूप पाहिले; ED, CBI बाजूला ठेवून या; संजय राऊतांचं फडणवीसांना आव्हान...

मुंबई- ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर फडणवीसांनी खरपूस समाचार घेतला. आता संजय राऊतांनी फडणवीसांवर घणाघात केला आहे. भिजलेले काडतूस खूप पाहिले, सीबीआय, ईडी बाजूला ठेवा मग काडतूसचा अर्थ सांगतो असे म्हणत संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. फडतूस हा अतिशय सौम्य शब्द असून फडतूस म्हणजे अर्थहीन असे राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. काय होतास तू, काय झालास तू, असा कसा वाया गेलास तू? उद्धव ठाकरे मला फडतूस गृहमंत्री म्हणतात, मात्र मी फडतूस नाही काडतूस आहे. झुकेगा नही तो घुसेगा, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमके फडतूस कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेवर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
तुम्ही ठाकरे परिवारातील सदस्याला काय म्हणालात, कोणत्या शब्दात बोललात, ते महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. ईडी, सीबीआय भाजपाचे बॉडीगार्ड आहे. ईडी, सीबीआय बाजूला ठेवा, मग काडतूसचा अर्थ सांगतो, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं. तसेच तुमचं काडतूस भिजलेलं आहे, ते उडत नाही, असंही संजय राऊत म्हणाले. तुम्ही झुकेगा नही, म्हणताय, मात्र तुम्ही झुकलेलेच आहात. शिंदेसोबत काम करायला लागणं म्हणजे झुकणचं आहे. ज्याला नीट वाचता येत नाही, अशा व्यक्तीसोबत तुम्ही काम करताय, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांनी विधानभवनाच्या साक्षीने हसतहसत हस्तांदोलन केल्याच्या तेराव्या दिवशी दोघांमध्ये शाब्दिक राडा झाला. फडणवीस हे फडतूस गृहमंत्री असून, त्यांना गृहमंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा, अशा शब्दांत ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. त्यावर, अडीच वर्षांच्या काळात ज्यांनी घरी बसून काम केले, त्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असे फडणवीस यांनी ठाकरेंना ठणकावले.
Comments