महाविकास आघाडी सज्ज; पवार, ठाकरे अन् पटोले एकत्र करणार महाराष्ट्र दौरा...
- MahaLive News
- Jul 4, 2023
- 1 min read

मुंबई- अजित पवार आणि समर्थकांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करणासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. यासंदर्भात नुकतीच काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादीतील फुटीनंतरची रणनीती ठरवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, नसीम खान यांची उपस्थिती होती. या बैठकांनंतर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते मिळून महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं निश्चित करण्यात आलं.
या दौऱ्याला उत्तर महाराष्ट्रातून लवकरच सुरुवात होणार असून लोकशाहीविरोधी भाजपला राज्यातून उखडून टाकणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दुसरीकडं शिवसेनेच्या ठाकरे गटाचीही बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडी अभेद्य असल्याचं मान्य करण्यात आलं. शरद पवार एकटे नाहीत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. ते मजबूत आहेत मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. शरद पवार हे बाळासाहेब ठाकरेंसारखेच आहेत ते कधीही स्वतःला एकटं समजणार नाहीत, असं शिवसेनेच्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Comments