अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार; तारीखही आली समोर...
- MahaLive News
- Jul 5, 2023
- 2 min read

महाराष्ट्रात शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसही दोन गटात विभागली गेली आहे. पहिला शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट. आपली ताकद दाखवण्यासाठी दोघांनी आज (बुधवार) बैठक बोलावली आहे. अजित पवार यांनी २ जुलै रोजी ८ आमदारांसह शपथ घेतल्यानंतर अजित पवार आणि उर्वरित बंडखोरांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा जास्त समर्थक आमदारांसह पक्षातून बंडखोरी केली आणि शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. मात्र संसदेचे पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टला संपल्यानंतर अजित पवार हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत असा धक्कादायक दावा एका इंग्रजी अहवालातून करण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व 16 आमदारांना अपात्र ठरवतील. त्यामुळे त्या सर्व जणांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. आणि संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होईल. यानंतर अजित पवार शिंदेंची जागा घेतील आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. हा सगळा फॉर्म्युला केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने ठरवण्यात आल्याचे अहवालात म्हंटल आहे. रेडीफने केलेल्या दाव्यानुसार, भाजपकडून अजितदादांना शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील होण्यास आणि संसदेचे पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू असं आश्वासन भाजपने अजित पवारांना दिले आहे. येव्हडच नव्हे तर मागील वर्षी 20 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंविरुद्ध बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन करण्यापूर्वीच अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी नियमित संपर्कात होते. परंतु त्यावेळी भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी फेटाळल्यामुळे शेवटच्या क्षणी हा प्लॅन फसला, जर त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीपूर्वीच अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याची राष्ट्रवादीची मागणी भाजपने मान्य केली असती तर आधीच भाजपसोबत सरकार स्थापन केले असते,” असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने म्हटले आहे.
Comentarios