top of page
Search

गणपती हॉस्पिटल 'ऑक्सिजन' स्वयंपूर्ण; हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे दोन प्लांट कार्यान्वित...

Writer's picture: MahaLive NewsMahaLive News

#जळगाव- कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी तर ऑक्सिजन अभावी रुग्णांचा गुदमरून जीव जात आहे. ऑक्सिजनची जमवाजमव करण्यात प्रशासन व आरोग्य यंत्रणेची कसोटी लागत आहे. अशा भयावह परिस्थितीत जळगाव शहरातील गणपती हॉस्पिटल मात्र, ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. या हॉस्पिटलमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे दोन प्लांट उभारले आहेत. त्यातून दररोज 120 ते 130 जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होत आहे, अशी सुविधा असणारे उत्तर महाराष्ट्रातील हे एकमेव रूग्णालय आहे. कोरोनाच्या उपचारात गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन सर्वाधिक महत्त्वाचा आहे. भविष्यातील ऑक्सिजन तुटवड्याच्या गंभीर संकटाला सामोरे जाण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, याचे गांभीर्य ओळखून दूरदृष्टी ठेवत गणपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलने हवेतील ऑक्सिजन वेगळा करणारे स्वतःचेच स्वयंचलित दोन प्लांट कार्यान्वित केले आहेत. त्यामुळे दररोज शंभरावर रुग्णांना विनाखंडित ऑक्सिजन पुरवठा करणे या हॉस्पिटलला शक्य झाले आहे. सद्यःस्थितीत देशभरातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, गणपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याकडील रुग्णांना ते परिपूर्ण व विनाअडथळा देत असल्याने रुग्णांसह समाजघटकांकडून या सेवेचे कौतुक होत आहे. गेल्या वर्षी मार्च अखेरीस संपूर्ण देशभरात कोरोनाने विळखा घातला आणि वर्षभर हे थैमान सुरूच राहिले. त्यात सप्टेंबर 2020 मध्ये जिल्ह्यासह राज्यभरात ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा जाणवू लागला होता. या पार्श्वभूमीवर गणपती हॉस्पिटल व्यवस्थापनाने त्यावर उपाय म्हणून उत्तर महाराष्ट्रात ऑक्सिजन निर्मितीचे सर्वांत मोठे काम करणार्‍या अमेरिकन ‘हेअर सेट’ या कंपनीशी संपर्क साधला. त्यानंतर हा स्वयंचलित प्लांट कार्यान्वित करताना विजेवर चालणार्‍या प्रेशर कॉम्प्रेसरसह ऑक्सिजन जनरेटर मशीनमध्ये (अ‍ॅरॉक्स मॉडेल) हवेतून ऑक्सिजन वेगळा करून तो दोन टँकमध्ये गोळा केला. 24 तासांत हवेतून साडेचार लाख लिटर ऑक्सिजन संकलित होऊन तो पाईपलाईनद्वारे रुग्णांपर्यंत विनाअडथळा, विनाखंडित पोहोचविला. या प्लांटसाठी एकाचवेळी 50 लाख रुपये खर्च करण्यात आला. त्यामुळे लिक्विड ऑक्सिजनवर अवलंबून राहणे तत्काळ थांबले. दोन्ही प्लांट पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असल्याने 24 तासात 9 लाख लीटर ऑक्सिजन निर्मिती होत आहे. गेल्या वर्षी ऑक्सिजन सिलिंडर अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत मिळत होते. आता या सिलिंडरची किंमत सातशे रुपयांपर्यंत पोहोचली आहे. कोरोनाचा विळखा दुसर्‍या टप्प्यातही अधिकाधिक घट्ट होत असताना देशभरातील सर्वच हॉस्पिटलना ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, गणपती हॉस्पिटलमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा नाही. दिवसभरात जेवढा ऑक्सिजन लागतो, तेवढ्या ऑक्सिजनची निर्मिती जागेवरच होत आहे. फक्त आणीबाणीच्या परिस्थितीतील खबरदारी म्हणून गणपती हॉस्पिटल दररोज 15 ते 20 सिलिंडर बाहेरून बॅकअपसाठी मागवून ठेवते. रुग्णालयाचा पूर्वी ऑक्सिजनवर होणारा लाखो रुपयांचा खर्च आता काही हजारांवर आला आहे. विशेष म्हणजे, वन टाईम इन्व्हेस्टमेंटमध्ये ऑक्सिजनची ही सुविधा लाईफटाईम असणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. शीतल ओसवाल यांनी दिली. गेल्या वर्षी कार्यान्वित केलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्लांटच्या यशस्वितेचा अनुभव गाठीशी होताच. त्यातून भविष्यात ऑक्सिजन पुरवठ्याचे संकट किमान आपल्यावर तरी येऊ नये, ही दूरदृष्टी ठेवत या हॉस्पिटलतर्फे 15 एप्रिल रोजी दुसरा प्लांटही कार्यान्वित करण्यात आला. या प्लांटमुळे प्रतिदिन एकूण नऊ लाख लीटर ऑक्सिजनची निर्मिती होऊ लागली आहे. त्यामुळे शंभर बेडची मान्यता असलेल्या गणपती हॉस्पिटलची गरज सहजपणे पूर्ण होत आहे. सद्यःस्थितीत देशभरात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. दोन्ही प्लांटमुळे आमच्या हॉस्पिटलतर्फे संकटकाळातही दररोज रुग्णांना अखंडितपणे दिल्या जाणार्‍या ऑक्सिजन पुरवठ्यासह अन्य सेवा-सुविधांचे निश्चितपणे समाधान आहे, असेही संचालक डॉ. शीतल ओसवाल, रुग्णालयप्रमुख डॉ. कल्पेश गांधी, ‘सीईओ’ तेजस जैन, डॉ. लीना पाटील, डॉ. ललित पाटील, संदीप भुतडा व कुणाल मराठे यांनी सांगितले.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, ९४०४२७७७३१ Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here... 

@महालाईव्ह न्यूज जळगाव

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

हास्य कवी संमेलन... Mahalive Special Report
Play Video
bottom of page