ठाकरे सरकारच ठरलं; अखेर राज्यात १८ ते ४४ वयोगटासाठी सरसकट मोफत लसीकरण...
- MahaLive News
- Apr 28, 2021
- 1 min read

#मुंबई- १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. देशातील अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. तर महाराष्ट्र सरकारने देखील मोफत लसीकरणासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत थेट ट्विट करून घोषणा केली होती. मात्र, यानंतर दोन्ही मंत्र्यांना अवघ्या तासाभरात ट्विट डिलीट करावं लागलं होतं. आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थिती, मोफत लसीकरण, लॉकडाऊन याचसोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे. दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक सुरु झाली असून आता मोफत लसीकरणाबाबतची महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं सरसकट लसीकरण केलं जाणार आहे. तब्बल ५ कोटी ७१ लाख जनतेचं मोफत लसीकरण केलं जाणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लसीकरणात दोन्ही डोस मोफत दिले जाणार आहेत. यामुळे एकूण ११ कोटींहून अधिक डोस या मोहिमेतून दिले जाणार आहेत. तर, दुसरीकडे राज्याच्या तिजोरीवर सुमारे ६५०० कोटींचा अधिकचा भार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेस मंत्र्यांनी सरसकट मोफत लसीकरणासाठी आग्रही मागणी केली होती. तर, राष्ट्रवादीने फक्त गरजुंचे मोफत लसीकरण करावे अशी भूमिका मांडल्याची माहिती समोर येत आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments