मुख्यमंत्री ठाकरेंचा पंतप्रधानांना 24 तासात 3 वेळा फोन; ऑक्सिजन तुटवड्याने महाराष्ट्राची परिस्थिती..
- MahaLive News
- Apr 17, 2021
- 2 min read

#मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 24 तासात तब्बल तीनवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक आणि ऑक्सिजन तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला 1200 ते 1500 मेट्रीक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली. या दोघांमध्ये महाराष्ट्रातील आणि मुंबईतील ऑक्सिजनचा तुटवड्याबाबत चर्चा झाली. काल मुंबईतील काही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमरता होती. त्यामुळे काही रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले होते. त्यावरुनच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना फोन करुन, महाराष्ट्रातील चिंताजनक परिस्थिती कळवली. राज्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयानक झाली आहे. राज्यात ऑक्सिजनचा साठाही अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांनाच फेसबुकवरून लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजनचा साठा आणण्यास परवानगी द्यावी, असं आवाहन केलं होतं. उद्धव ठाकरे यांनी 13 एप्रिलला संचारबंदी जाहीर करताना, जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी ऑक्सिजन तुटवड्याची माहिती दिली होती. पंतप्रधानांशी माझी नुकतीच बैठक झाली आहे. त्यात त्यांना ऑक्सिजनची मागणी केली आहे. इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांच्याकडे केला आहे. त्यांनी परवानगीही दिली आहे. मात्र, ईशान्येकडील राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. दररोज हजारो किलोमीटरचा प्रवास करून रस्ते मार्गे हे ऑक्सिजन आणावं लागणार आहे. परंतु आपल्याला ऑक्सिजनची खूप गरज आहे. त्यामुळे रस्तेमार्गे ऑक्सिजन आणणं परवडणारं नाही. त्यामुळे लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजन आणण्याची पंतप्रधानांनी परवानगी द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली होती. देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाही, महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ही परिस्थिती देशातील अनेक राज्यांमध्ये आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आढावा बैठक घेतली. त्यांनी सध्याच्या ऑक्सिजन साठा, निर्मिती आणि पुरवठ्याची माहिती घेतली. पंतप्रधानांनी कोरोनाने सर्वाधिक त्रस्त असलेल्या 12 राज्यांमध्ये पुढील 15 दिवस ऑक्सिजन पुरवठा कसा होईल याची माहिती घेतली. प्रत्येक ऑक्सिजन प्लांटची क्षमता वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या टँकर्सवर कोणतेही निर्बंध घालू नका, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
Comments