मुंबईकरांसाठी दीड लाख कोरोना लसींचा साठा; पुढील 3 दिवस लसीकरणाचा मार्ग मोकळा...
- MahaLive News
- Apr 26, 2021
- 1 min read

#मुंबई- महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचं आहे. कोविड प्रतिबंध लसीचा तुटवडा जाणवत असतानाच रविवारी मुंबईसाठी 1 लाख 58 हजार मात्रा मिळाल्या आहेत. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांना त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारपासून किमान 3 दिवस मुंबईतील लसीकरण सुरळीत होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, मुंबईला मिळालेल्या लस साठ्यात कोव्हॅक्सिन लसीचा साठा अतिशय मर्यादीत असल्याने मोजक्याच केंद्रांवर आणि त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेला आज कोविशिल्ड लसीच्या 1 लाख 50 हजार तर कोव्हॅक्सिन लसीच्या 8 हजार अशा एकूण 1 लाख 58 हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत. हा साठा महानगरपालिकेच्या कांजूरमार्ग येथील प्रादेशिक लस साठवण केंद्रात नेण्यात आला आहे. मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी अशा सर्व लसीकरण केंद्रांना कांजूरमार्ग येथूनच त्यांची सरासरी दैनंदिन आवश्यकता लक्षात घेऊन लस साठा वितरण सुरू करण्यात आले आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, ९४०४२७७७३१ Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments