३१ तारखेनंतर पुण्यातील लॉकडाऊन शिथिल करा; व्यापारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…
#पुणे– 31 तारखेनंतर सर्व व्यापाऱ्यांना दुकाने सुरु करायला परवानगी द्यावी अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी या मागणी संदर्भात पत्र लिहिले आहे. पुणे शहरात रुग्ण संख्या वाढल्यामुळे आधी शहरात निर्बंध लावण्यात आले होते.
त्यानंतर राज्यात लॉकडाउन लावल्यापासून अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. त्या पार्श्वभुमीवर ही मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात दि.५एप्रिल पासून सुरु झालेल्या लॉकडाउन च्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार वगळूण अन्य सर्व व्यापार बंद राहिल्याने राज्यातील पर्यायाने पुण्यातील व्यवसाय आर्थिक अरिष्टात सापडले आहेत. गुढी पाडवा ,अक्षयतृतीया, ईद हे महत्वाचे सण लॉक डाउन असल्याने व्यापाराविना गेल्याने व्यापार क्षेत्राला या दोन महिन्यात सुमारे ७५ हजार कोटींचा फटका बसणार आहे असा दावा महासंघाच्या वतीने करण्यात आला आहे. व्यापारी क्षेत्र तब्बल २ महिन्याच्या लॉक डाउन मुळे अत्यंत अडचणीत आले असून आता व्यापाऱ्यांनी काहीही उत्पन्न नसताना १/२ महिने कर्मचाऱ्याचे पगार हि दिले परंतु यापुढे कर्मचाऱ्यांना घरबसून पगार देणे अशक्य झाले आहे तसेच काम आणि उत्पन्नच नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर आपल्या नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे पर्यायाने बेरोजगारी वाढत आहे असे या पत्रात महासंघाने म्हणले आहे. व्यापारी ,कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत सापडले असल्याने व्यापाऱ्यांना व्यापार सुरु करण्याची परवानगी दयावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. व्यापार क्षेत्र टिकवण्यासाठी सरकारकडून मदतीची आणि सहकार्याची आवश्यक्यता आहे,त्यामुळे सरकारने व्यापाऱ्यांना तीन महिन्याचे वीज बिल व बँक कर्जावरील व्याज माफ करावे तसेच स्थानिक मालमत्ता कर माफ करुण महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांना लवकरात लवकर भरीव आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशीही मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. “व्यापाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य केले आहे. आपणास नम्र विनंती आहे कि ३१ मे नंतर लॉक डाउन अधिक न वाढवता नियमांना अधीन राहून व्यापार सुरु करण्यास परवानगी देवून सहकार्य करावे”असे व्यापारी महासंघांचे अध्यक्ष फतेचंद रांका म्हणाले.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज पुणे
Comments